jewish genuine
मेन्युइन, येहूदी : (२२ एप्रिल १९१६ – १२ मार्च १९९९). प्रख्यात अमेरिकन व्हायोलिनवादक. भारतीय संगीताच्या संदर्भात त्यांची कामगिरी विशेष मोलाची मानली जाते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात रशियन ज्यू (यहुदी) कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मोशे हे राब्बींच्या (सामान्यतः ज्यू विद्वानांना तसेच ज्यू धार्मिक ग्रंथ व तत्त्वे शिकविणाऱ्यांना ही उपाधी लावली जाते) कुटुंबातील होते. १९१९ च्या उत्तरार्धात मोशे आणि त्यांची पत्नी मारुथा अमेरिकन नागरिक बनले आणि त्यांनी कुटुंबाचे नाव बदलून मेन्युइन केले. येहूदींची आई पियानोवादक होती व त्यांच्याकडून येहूदींना संगीताचे बाळकडू मिळाले. त्यांच्या लहानपणीच कुटुंबाचे स्थलांतर सॅन फ्रॅन्सिस्को येथे झाले व तेथेच त्यांच्या सांगीतिक जीवनाची जडणघडण झाली. येहूदी मेन्युइनच्या बहिणींपैकी एक हेफझीबाह या पियानोवादक आणि मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या, तर दुसऱ्या यलता या पियानोवादक, चित्रकार आणि कवी होत्या.
येहूदी यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली. सुरुवातीस सिग्मंड आंकरकडे (Sigmund Anker) आणि पुढे लुईस पर्सिंजरकडे (Louis Persinge) त्यांनी व्हायोलिनचे धडे घतले. वयाच्या सातव्या वर्षी ‘सॅन फ्रॅन्सिस्को ऑर्केस्ट्रा’ समवेत त्यांनी व्हायोलिनवादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला आणि जाणकार रसिकांची प्रशंसा मिळवली. तसेच अकराव्या वर्षी लूट्व्हिख व्हान बेथोव्हनच्या काँचेर्टोचे वादन करून अप्रतिम तंत्रकौशल्य व सूक्ष्म संवेदनशीलता या गुणांच्या बळावर त्यांनी संगीतजगताला अचंबित केले. येहूदी यांनी पॅरिसमध्ये रोमानियन संगीतकार आणि व्हायोलिनवादक झॉर्झ एनेस्को (George Enescu) यांच्याकडे संगीताचे पुढील शिक्षण घेतले. त्यांच्या वादनशैलीचा येहूदी यांच्यावर खूप प्रभाव पडला. एनेस्कोंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली बहीण हेफझीबाहसोबत तसेच इतरही अनेक पियानोवादकांसोबत वादनाचे यशस्वी कार्यक्रम केले. १९३६ नंतर त्यांनी वर्ष-दीड वर्ष वादनाचे जाहीर कार्यक्रम थांबवून अधिक अभ्यास व सराव यांच्या योगे स्वतःची वेगळी शैली सिद्ध केली. नंतर त्यांनी पुन्हा संगीताचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. आपल्या संगीत कार्यक्रमांतून दुर्मीळ व नवनव्या रचना सादर करण्यावर त्यांनी कटाक्ष ठेवला. हंगेरियन संगीतकार, पियानोवादक आणि मानववंशशास्त्रज्ञ बेलॉ बॉर्टोकच्या सोनाटा फॉर सोलो व्हायोलिन या रचनेचा या संदर्भात उल्लेख करता येईल. ही रचना १९४३ मध्ये पूर्ण झाली आणि १९४४ मध्ये न्यूयॉर्क येथे येहूदी यांनी ही रचना प्रथम सादर केली.
लंडनमध्ये मास्टर येहूदी मेन्युइन या नावाने त्यांच्या कार्यक्रमाचे पहिले ध्वनिमुद्रण प्रसिद्ध झाले (१९३१). १९३२ मध्ये येहूदी यांनी ब्रिटिश संगीतकार एडवर्ड एल्गार यांच्या व्हायोलिन काँचेर्टोचे एचएमव्ही कंपनीसाठी ध्वनिमुद्रण केले. १९३४ ते १९३६ च्या दरम्यान त्यांनी जर्मन संगीतकार योहान झेबास्टिआन बाख यांची sonatas and partitas for solo violin ही संगीतरचना ध्वनिमुद्रणासाठी सादर केली. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान येहूदी यांनी दोस्त राष्ट्रांच्या सैनिक आणि युद्धकैदी यांच्यासाठी अनेक कार्यक्रम केले. येहूदी आणि हंगेरियन संगीतकार लुई केंटनर (Louis Kentner) यांनी इंग्लिश रचनाकार विल्यम वॉल्टनच्या व्हायोलिन सोनाटाचे सादरीकरण झुरिकमध्ये केले (१९४९). राणी एलिझाबेथ संगीत स्पर्धेत त्यांनी परिक्षकाची भूमिका उत्तम रीतीने निभावली (१९५५). तसेच क्षटाट, स्वित्झर्लंड (१९५७ पासून); बाथ, इंग्लंड (१९५९–६८); विंझर, इंग्लंड (१९६९–७२) येथील वार्षिक संगीतमहोत्सवांमध्ये त्यांनी अध्यक्षपदे सांभाळली.
१९५७ मध्ये येहूदी यांनी स्वित्झर्लंडच्या गस्टॅड येथे “गस्टॅड मेन्यूहिन फेस्टिव्हल” ची स्थापना केली. पुढे ते लंडनला गेले (१९५९). त्यांनी स्टोक द ॲबरनॉन, सरे येथे संगीताची विशेष देणगी लाभलेल्या मुलांसाठी ‘येहूदी मेन्युइन स्कूल’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली (१९६३). १९६५ मध्ये त्यांना ब्रिटीश राजदरबाराकडून मानद “नाईटहूड” सन्मान मिळाला. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियन संगीतकार माल्कम विल्यम्सन यांनी त्यांच्यासाठी व्हायोलिन कार्यक्रमाची रचना केली.
पं. नेहरूंच्या आमंत्रणानुसार येहूदी यांनी भारताचा दौरा केला. योगविद्या व भारतीय संगीत यांना पाश्चात्त्य जगतात दमदार प्रतिष्ठा मिळवून देण्याची त्यांची कामगिरी लक्षणीय आहे. १९६६ मध्ये बाथ येथे व १९६७ मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सभागृहात प्रख्यात सतारवादक रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी जुगलबंदीचे कार्यक्रम केले. त्यांत त्यांनी शास्त्रोक्त भारतीय संगीतरचना सादर केल्या. १९७३ मध्ये आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी १ ऑक्टोबर हा “आंतरराष्ट्रीय संगीत दिन” म्हणून घोषित केला. तसेच पौर्वात्य संगीताला पाश्चिमात्त्य जगात अधिक प्रतिष्ठा लाभावी म्हणून त्यांनी बरीच खटपट केली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील सर्वांत मोठा संगीत प्रकल्प लाइव्ह म्युझिक नाऊ याची स्थापना येहूदी आणि इयान स्टाउट्झ्कर (Ian Stoutzker) यांनी केली (१९७७). या प्रकल्पाद्वारे प्रतिष्ठित संगीतकार आपली कला सामान्यजनांकरिता सादर करतात आणि त्याचे प्रशिक्षणही देतात. १९८३ मध्ये, मेन्यूहिन आणि रॉबर्ट मास्टर्स यांनी तरुण नवोदित व्हायोलिनवादकांसाठी “येहूदी मेन्युइन आंतरराष्ट्रीय मंच” या जगातील एका अग्रगण्य मंचाची स्थापना केली. या मंचाद्वारे तस्मीन लिटल, निकोलाज झेंडर, इल्या ग्रिंगोल्ट्स, ज्युलिया फिशर, डेशिन काशिमोतो आणि रे चेन इत्यादी वेगवेगळ्या देशांतील कलावंत जागतिक दर्जाचे व्हायोलिनवादक बनलेले आहेत. १९८० च्या दशकात येहूदींनी म्युझिक गाईड ही संगीतावरील पुस्तकांची मालिका तयार केली.
इंग्लंडमधील ब्रिटीश ट्रान्सनॅशनल समूहांनी स्थापन केलेल्या इलेक्ट्रिक अँड म्युझिकल इंडस्ट्रीज (इएमआय) या संस्थेबरोबरचा त्यांचा ध्वनीमुद्रणाचा करार सुमारे ७० वर्षे टिकला, जो संगीत उद्योगाच्या इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ काळ राहिलेला करार म्हणून ओळखला जातो. या संस्थेकरिता त्यांनी व्हायोलिनवादक आणि संगीत संयोजक म्हणून ३०० हून अधिक ध्वनीमुद्रणे केली. या संस्थेने येहूदींच्या कारकीर्दीच्या सन्मानार्थ ५१ ध्वनिमुद्रिका येहूदी मेन्युइन : द ग्रेट या नावाने प्रसिद्ध केल्या (२००९). त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येहूदींचे दीर्घकाळचे मित्र, फ्रेंच चित्रपट निर्माते व व्हायोलीनवादक ब्रूनो मॉन्सेनगेन यांच्या सहकार्याने मेन्युइन सेंच्युरी या नावाने ८० ध्वनिमुद्रिकांचा संग्रह या संस्थेने प्रसिद्ध केला (२०१६).
येहूदी यांचा पहिला विवाह ऑस्ट्रेलियन उद्योगपतींची मुलगी नोला निकोलस यांच्याशी झाला. त्यांना क्रॉव आणि जमीरा ही दोन मुले. १९४७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश नृत्यांगना आणि अभिनेत्री डायना गोल्डशी लग्न केले. या दाम्पत्याला जेरार्ड मेन्युइन आणि जेरेमी मेन्युइन हे दोन पुत्र. ते ही प्रसिद्ध पियानोवादक झाले.
येहूदींना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. सिटी ऑफ फ्रीडम पुरस्कार (एडिनबर्ग, स्कॉटलंड, १९६५); त्याचवर्षी ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर (केबीई) म्हणून नेमणूक; पं. जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार (१९६८); आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड (१९६९ – १९७५); ऑक्सफोर्ड, केंब्रिज, सेंट अॅड्र्यूज, व्रिजे युनिव्हर्सिटी, ब्रसेल आणि बाथ युनिव्हर्सिटी यांसह २० विद्यापीठांद्वारे मानद डॉक्टरेट (१९६९); केनेडी सेंटर ऑनर्स (१९८६); संगीतातील आजीवन योगदानाबद्दल ‘ग्लेन गोल्ड पुरस्कार’ (१९९०); इझ्राएलमधील वुल्फ फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा कला क्षेत्रातील ‘वुल्फ पुरस्कार’ (१९९१); सद्भावना राजदूत (युनेस्को, १९९२); संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती सर्वोच्च संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९४); त्यांना जर्मनीच्या “फेडरल रिपब्लिक ऑफ ऑर्डर ऑफ मेरिटचा” ग्रँड क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला (१९९७).
येहूदी यांनी बरीचशी ग्रंथरचनाही केली आहे. त्यात थीम अँड व्हेरिएशन्स (१९७२) हा लेखसंग्रह; व्हायोलिन : सिक्स लेसन्स (१९७२); डब्ल्यू. प्रिम्रोझ व डी. स्टीव्हन्ससमवेत व्हायोलिन अँड व्हायोला (१९७६) ही वादन तंत्रविषयक पुस्तके आणि कर्टिस डब्ल्यू. डेव्हिससमवेत द म्युझिक ऑफ मॅन (१९७९) यांचा उल्लेख करता येईल. त्यांचे अन्फिनिश्ड जर्नी (१९७६) हे आत्मचरित्र व त्यांची पत्नी डायना मेन्युइनने लिहिलेले फिडलर्स मोल : लाईफ विथ येहूदी हे पुस्तक यातून त्यांच्या व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनाचा भावपूर्ण आलेख पाहावयास मिळतो.
बर्लिन, जर्मनी येथील मार्टिन ल्यूथर हॉस्पिटलमध्ये आजारपणामुळे येहूदींचे निधन झाले.
संदर्भ :
Menuhin, Yehudi, Theme and variations, new york, 1972.
Menuhin, Yehudi, Violin, 1974.
लेख के प्रकार
- Log in to post comments
- 9 views