भूर्जीखाँ
भूर्जीखाँ : (ॽ १८९० – ५ मे १९५०). जयपूर-अत्रौली घराण्याची गायन परंपरा संक्रमित करणारे एक थोर गायक. त्यांचे पूर्ण नाव शमशुद्दिन गुलाम अहमद ऊर्फ भूर्जीखाँ असून त्यांचा जन्म बुंदी (राजस्थान) येथे झाला. संगीतसम्राट उस्ताद अल्लादियाखाँ यांच्या नसिरुद्दीन (बडेजी), बद्रुद्दीन (मंजीखाँ) व शमशुद्दीन या तीन पुत्रांपैकी हे कनिष्ठ चिरंजीव. भूर्जीखाँ यांना तेजस्वी बुद्धिमत्तेबरोबरच निसर्गदत्त मधुर व पल्लेदार आवाजाची देणगी लाभली होती. त्यांच्या ज्येष्ठ बंधुद्वयांना अल्लादियाखाँची मिळत असलेली तालीम ऐकल्यामुळे विविध रागांतील अनेक बंदिशींचे तसेच अनेक रागांचे संस्कार त्यांच्यावर आपापत: झाले. अल्लादियाखाँ यांची कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षि शाहू महाराज यांनी दरबारगायक म्हणून नेमणूक केली (१८९५-९६). अल्लादियाखाँच्या मागोमाग त्यांचे कुटुंबीयही कोल्हापूरास आले. त्यामुळे भूर्जीखाँ बरीच वर्षे कोल्हापुरात वास्तव्यास होते.
भूर्जीखाँ त्यांचे मोठे बंधू उ.मंजीखाँ व उ.नसिरुद्दिनखाँ यांच्या विवाहप्रसंगी उनियारा (भूतपूर्व जयपूर संस्थान) या त्यांच्या घराण्याच्या मूळ गावी गेले असता तापाने आजारी पडले. हे दुखणे वाढून त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला व घसा धरला. आवाजात बिघाड झाल्यामुळे व पूर्वीची स्मरणशक्ती व धारणाशक्ती न उरल्याने रियाजाने आत्मसात केलेल्या रागातील चिजाही त्यांना आठवत नसत. परिणामत: त्यांची गाण्याबद्दलची उमेद खचली. तेव्हा अल्लादियाखाँसाहेबांनी त्यांना गायकीची तालीम देणे बंद केले. हळूहळू त्यांची तब्येत जशी सुधारू लागली. तशी त्यांचे काका उस्ताद हैदरखाँ यांच्याकडे ते संगीताची तालीम घेऊ लागले. हैदरखाँच्या प्रयत्नाने भूर्जीखाँची गाण्यातली प्रगल्भता वाढली. त्यांनी चुलत्यांकडे येणाऱ्या खानदानी कलावंतांच्या चर्चा ऐकल्या, मनन केले व त्याप्रमाणे रियाज करू लागले. दरम्यान राजर्षि शाहू महाराजांनी भूर्जीखाँना महालक्ष्मी मंदिरात गानसेवा करायचा आदेश दिला. त्याप्रमाणे ते नियमित गायन करीत असत. कालांतराने अल्लादियाखाँ यांनी त्यांच्या आवाजात झालेला बदल ऐकला आणि त्यांना आश्चर्य वाटले. या प्रसंगानंतर खाँसाहेबांनी त्यांना पुन्हा तालीम देण्यास सुरुवात केली.
भूर्जीखाँचे मोठे बंधू मंजीखाँ यांचे (१९३७) अकाली निधन झाल्यामुळे जयपूर-अत्रौली गायकीची परंपरा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी भूर्जीखाँवर आली. भूर्जीखाँ हे उत्तम शिक्षक होते. त्यांची तालीम देण्याची पद्धतही अतिशय शिस्तबद्ध होती. मंजीखाँ यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य मल्लिकार्जुन मन्सूर यांना भूर्जीखाँनी तालीम दिली. त्यांच्या शिष्यगणातील मधुसुदन कानेटकर, भूर्जीखाँचे चिरंजीव अझिजुद्दिनखाँ ऊर्फ बाबा, गजाननबुवा जोशी, आझमबाई, वामनराव सडोलीकर, मधुकर सडोलीकर, धोंडुताई कुलकर्णी इत्यादींनी जयपूर-अत्रौली गायकीचा वारसा जतन केला व पुढे नेला.
वयाच्या अवघ्या साठाव्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.
संदर्भ :
टेंबे, गोविंदराव; संपा. देशपांडे, वामनराव, जोशी, बाबुराव, गायनमहर्षी अल्लादियाँखाँ यांचे चरित्र, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९८४.
समीक्षक – सु. र. देशपांडे
लेख के प्रकार
- Log in to post comments
- 8 views