Skip to main content

बृहद्देशी

संगीतशास्त्रकार मतंग यांनी इ. स.चे सातवे ते आठवे शतक यांदरम्यान संगीतशास्त्रावर लिहिलेला एक संस्कृत ग्रंथ. प्राचीन सामगायन व जातीगायन हे गंभीर, नियमबद्ध संगीत लोप पावत चालले असताना व रंजकतेला प्राधान्य देणारे संगीत उदयाला येत असतानाच्या काळात होत असलेली सांगीतिक परिवर्तने या ग्रंथात आढळतात. बृहद् म्हणजे व्यापक. देशी संगीताचे व्यापक स्वरूपात विवरण केले आहे, म्हणून या ग्रंथास बृहद्देशी  हे नाव सार्थ वाटते. त्या काळात नव्याने उदयास आलेली राग संकल्पना व तत्कालीन रागांचे वर्गीकरण तसेच देशी संगीत, स्वरगीती व प्रबंध या महत्त्वपूर्ण संज्ञांची चर्चा या ग्रंथात पहिल्यांदा केली गेली असल्यामुळे आधुनिक संगीताची मुळे शोधण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या ग्रंथाची १५ प्रकरणे आहेत. या ग्रंथात गायन, वादन व नृत्य या तीनही विषयांवर लेखन होते; मात्र त्यांतील काही भाग गहाळ झाला आहे.

पहिल्या ‘देश्युत्पत्ति’ या प्रकरणात बारा श्लोक आहेत. यामध्ये संगीताला ध्वनी असे संबोधले असून देशादेशात प्रचलित असलेला ध्वनी तो देशी अशी व्याख्या दिलेली आहे. दुसऱ्या ‘देशी-लक्षण’ या प्रकरणात सामान्यजनांच्या रंजनासाठी त्यांच्याचकडून जे संगीत निर्माण केले जाते ते, ‘देशी संगीत’ होय. अशी व्याख्या दिलेली असून त्यासंबंधीचा श्लोक पुढीलप्रमाणे

‘अबलाबालगोपाल क्षितीपालीनिर्मेच्छाया l गायतेसानुरागेन स्वदेशे देशीर्उच्च्यते l’

                                                                (सार – स्त्रिया, गोपाल इत्यादी स्वेच्छेने आणि आपापल्या आवडीने आपल्या देशात गातात, ते देशी संगीत होय.)

यानंतरचे ‘नादलक्षण’ प्रकरण दहा श्लोकांचे असून नाद सूक्ष्म, अतिसूक्ष्म, व्यक्त, अव्यक्त, कृत्रिम अशा पाच प्रकारचा आहे, हे सांगितले आहे. पुढच्या ‘श्रुतिनिर्णय’ या प्रकरणात स्वरांची स्थित्यंतरे व श्रुतीबद्दलची मतमतांतरे आणि श्रुतीविषयक तात्त्विक चर्चाही केलेली आहे. स्वरसप्तकातील श्रुतींची व्यवस्था दंड-प्रस्तार आणि वीणा-प्रस्तार अशा दोन कोष्टकातून दाखविली आहे.

पुढच्या ‘स्वर-निर्णय’ या प्रकरणामध्ये वादी, संवादी, विवादी, ग्राम, मूर्च्छना यांच्या व्याख्या, आर्चिक, गाथिक आणि स्वरान्तर यांची लक्षणे, मूर्छनांचे पूर्णा, ओडव, षाडव व साधारणा हे प्रकार, मंद्र, मध्य, तार ही तीन स्थाने, स्वरप्रस्तार यांचे विवेचन येथे प्राप्त होते. मार्गी संगीतातील ग्रह, अंश, न्यास इत्यादी दहा जातीलक्षणे, शुद्ध व विकृत जाती यांची माहिती या प्रकरणात दिलेली आहे. त्या काळात लोप पावण्याच्या मार्गावर असलेल्या संगीताचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या प्रकरणात केलेले आहे.

‘रागलक्षण’ या प्रकरणात राग या संज्ञेची सुयोग्य व्याख्या या ग्रंथात प्रथमच देण्यात आली आहे.

स्वर-वर्ण-विशेषेण ध्वनि-भेदेन वा पुन: ।

रज्यते येन य: कश्चित्, स राग: संमत: सताम् ॥

(सार – स्वर-वर्ण-विभूषित असून जो जनचित्ताचे रंजन करतो, त्याला राग म्हणावे)

केवळ विशिष्ट स्वरसमुदाय म्हणजे राग नव्हे, तर त्या स्वरांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी व उच्चारणाने राग सिद्ध होतो हे या प्रकरणात स्पष्ट करण्यात आहे आहे. याशिवाय स्वर लगावांचीही रागसिद्धतेमध्ये महत्त्वाची भूमिका असते याची चर्चा ‘स्वरगीती’ या विभागामध्ये केली आहे. शुद्धा, भिन्ना, वेसरा, गौडी व साधारणा अशा पाच स्वरगीती सांगितल्या आहेत व गीतींशी संलग्न राग दिलेले आहेत. उदाहरणार्थ – शुद्धषाडव, शुद्ध कैशिकमध्यम, भिन्नषड्ज, गौडकैशिक, वेसरषाडव इत्यादी.

यानंतरच्या ‘भाषा-लक्षणम्’ या प्रकरणामध्ये भाषा, विभाषा व अंतरभाषा या तीन मुख्य वर्गांमध्ये रागांचे वर्गीकरण सांगितले आहे. टक्क, मालव, हिंदोल इत्यादी पंधरा रागांच्या भाषा म्हणजेच त्या शैलीने गायिले जाणारे राग सांगितले आहेत. त्या काळाच्या मानाने पारंपारिक असणारे ग्रामराग व आधुनिक असणारे देशी राग वर्णिले आहेत व पुढे देशी रागांमधील भाषांग, क्रियांग, उपांग रागांची चर्चा केली आहे. ग्रह, अंश, न्यासादी स्वर, त्यांत योजण्याचे विशिष्ट अलंकार, चलन दर्शविणारी सरगम यांद्वारे या रागांची माहिती दिलेली आहे.

‘प्रबंधाध्याय’ या प्रकरणामध्ये देशी संगीतातील विविध गीतप्रकारांसाठी मतंगमुनींनी देशिकार प्रबंध ही संज्ञा दिली आहे. चतुष्पदी, षट्पदी, चतुरंग, स्वरार्थ प्रबंध, करण, पाटकरण, कैवाट, एकताली इत्यादी पंचाहत्तर प्रबंधांचे विवरण येथे दिले असून गीतदोषांची चर्चाही केली आहे. प्रबंधाचे धातु व अंगे यांची चर्चा या ग्रंथात आढळत नाही. प्रबंधसंज्ञेचे विस्तृत विवेचन पुढील काळातील संगीतरत्नाकर  या ग्रंथात आले आहे. यापुढील ‘वाद्याध्याय’ हे प्रकरण गहाळ झाल्यामुळे त्याची संपूर्ण माहिती मिळत नाही. मात्र, हे प्रकरण नावाप्रमाणेच संगीत विषयक वाद्ये यांना वाहिलेले होते. अशी माहिती मिळते.

संदर्भ :

देसाई, चैतन्य, संगीतविषयक संस्कृत ग्रंथ, पुणे, १९७९.
 मालवीय, श्रद्धा, भारतीय संगीतज्ञ एवं संगीतग्रंथ, कनिष्क पब्लिशर्स अँड डिस्ट्रिब्यूटर्स, नई दिल्ली.
 वर्मा, सिम्मी, प्राचीन एवं मध्यकाल के शास्त्रकारोंका संगीतमें योगदान, कनिष्क
पब्लिशर्स अँड डिस्ट्रिब्यूटर्स, नई दिल्ली, २०१२.
 क्षीरसागर, डी. बी. अनु., श्रीमतङ्गमुनिकृत बृहद्देशी, जयपूर, १९९८.
The Oxford Encyclopedia of the Music of India, Vol.I, Sangeet Mahabharati , Oxford University Press, 2011.
 Sharma, premlata Ed. and Trans., Brihaddeshi of Sri Matangamuni, vol. I-II,  Indira Gandhi National Center for the Arts & Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1994.
 Sreenivasrao’s blog, http://sreenivasraos.com/tag/brihaddeshi wwwExotic India.combook/details/brihaddeshi.
समीक्षक – सु. र. देशपांडे

लेख के प्रकार