पुरंदरदास
पुरंदरदास : (सु. १४८४ – सु. १५६४). कर्नाटकातील एक थोर संतकवी, शास्त्रीय संगीतकार व रचनाकार. हे वसिष्ठ गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण असून माध्वमताचे होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील पुरंदरगडावर झाला, असे म्हणतात. पण काही विद्वानांच्या मते त्यांचा जन्म बळ्ळारी जिल्ह्यातील हंपीजवळील पुरंदरगड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वरदप्पा नायक. ते रत्नांचे व्यापारी होते. पुरंदरदासांचे जन्मनाम श्रीनिवास तथा तिम्मप्पा नायक. संस्कृत, कन्नड, संगीत या विषयांत त्यांनी शास्त्रोक्त ज्ञान संपादन केले होते. विजयानगरच्या कृष्णदेवरायांच्या दरबारात ते रत्नपारखी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी या व्यवसायात भरपूर संपत्ती मिळविली, तरी मात्र वृत्ती कृपण होती. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह सरस्वतीबाई यांच्याशी झाला. त्यांची पत्नी सरस्वतीबाई तिच्या दानशीलतेमुळे नवऱ्याच्या रोषास पात्र झाली असता, तिने एका ब्राह्मणाला दान म्हणून दिलेली नथ ईश्वरी चमत्कारामुळे परत तिच्या नवऱ्याच्या हाती आली आणि तिची अब्रू वाचली. या चमत्कारामुळे तिम्मप्पा नायक यांनी धनदौलत सोडून भिक्षापात्र अवलंबिले, अशी एक आख्यायिका आहे.
दासपंथाचे संस्थापक श्रीपादराय यांचे एक महान शिष्य व्यासराय यांनी तिमप्पा नायक यांना माध्व वैष्णव पंथाची दीक्षा दिली (१५२५) व पुरंदर विठ्ठल असे त्यांचे नाव ठेवले; पण व्यवहारात ते नाव पुरंदरदास असे झाले. पुरंदरदास जसे महान भगवद्भक्त होते, तसेच ते मोठे संगीतज्ञही होते. कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून त्यांना गौरविले जाते. कर्नाटक संगीत शिकविण्यासाठी त्यांनी पाठ तयार केले, म्हणून त्यांना आदिगुरू मानतात. कर्नाटक संगीताचे प्रमुख प्रवर्तक त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री यांना पुरंदरदासांपासूनच प्रेरणा मिळाली. त्यांच्या काळापासून ‘मायामालवगौळ’ हा राग संगीत अभ्यासकांना प्रारंभी शिकवला जाऊ लागला. त्यांनी रचलेले ‘कीर्तन’, ‘सुळादी’ आणि ‘उगाभोग’ हे काव्यप्रकार प्रसिद्ध आहेत. संस्कृत काव्यरचना करण्याची परंपरा मोडून त्यांनी देश भाषा-कानडी भाषेत ‘देवरनाम’ नामक भक्तिरचना केल्या. त्यांनी सु. ४,७५,००० पदे रचली असावीत, असे मानले जाते; तथापि त्यांपैकी काही हजार पदेच उपलब्ध आहेत. दक्षिण भारतात सर्वत्र गायल्या जाणाऱ्या त्यांच्या पदांमध्ये पुरंदर विठ्ठल असे कर्त्याचे नाव असते. ज्ञानेश्वर, तुकाराम इ. संतांनी महाराष्ट्रात वैष्णव धर्माचा प्रचार केला, त्याप्रमाणेच पुरंदरदासांनी दक्षिणेत, विशेषतः कर्नाटकात भक्तिपंथास लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या अनेक भजनांचे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद केलेले आहेत.
पुरंदरदासांचे कर्नाटकातील हंपी येथे समाधीस्थळ आहे. भारतीय टपाल खात्याने त्यांच्या ४०० व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण केले (१९६४). ख्यातनाम अभिनेते व नाटककार गिरीश कर्नाड यांनी कर्नाटक संगीतातील दोन महान विभूती म्हणून पुरंदरदास आणि कनकदास यांच्यावरील कनक-पुरंदर या माहितीपटाची निर्मिती केली (१९८८). २००७ मध्ये बंगळूर येथे पुरंदरदास मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टकडून पुरदरदासांच्या विविध रचनांचा प्रसार केला जातो आणि त्यांच्याविषयीच्या संशोधन कार्याकरिता मदत केली जाते.
संदर्भ :
कुमठेकर, बाबूराव, श्री पुरंदरदास के भजन, दिल्ली, १९६०.
Krishna Rrao, M. V., Purandara and the Haridasa Movement, Dharwar, 1966.
Sitaramiah, V., Purandaradasa, New Delhi, 1971.
मराठी भाषांतर व समीक्षण : अशोक रानडे; सुधीर पोटे
लेख के प्रकार
- Log in to post comments
- 79 views