Skip to main content

Mallikarjun Mansoor

Mallikarjun Mansoor

मन्सूर, मल्लिकार्जुन भीमरायप्पा : (३१ डिसेंबर १९१० – १२ सप्टेंबर १९९२). हिदुस्थानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांचा जन्म मन्सूर (कर्नाटक) येथे झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य मिरजेचे पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. पुढे जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू भूर्जीखाँ यांच्याकडे मन्सूर यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. विशेषत: मंजीखाँ यांच्या प्रतिभावंत पण बंडखोर गायकीचा मन्सूरांच्या शैलीवर विलक्षण प्रभाव दिसून येतो.

मन्सूरांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकाभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. मंजीखाँ यांच्याप्रमाणेच मन्सूर मराठी भावगीते उत्तम गात. ‘ही रात सवत बाई’ हे त्यांचे भावगीत त्यावेळी खूप गाजले. ते नाट्यगीत, ठुमरी आणि भजनेही गात असत. नंतर मात्र ते केवळ ख्यालगायन करत. त्यांनी कानडी संगीत नाटकांतूनही कामे केली व त्यावेळी त्यांच्या गायनाने रसिक मुग्ध होत असत. स्वच्छ, निकोप व सुरेल आवाज, उत्तम दमसास, लयकारीवरचे प्रभुत्व आणि रागमांडणीचे कल्पनाकौशल्य त्यांच्या गायनात प्रामुख्याने जाणवते. आवर्तनाच्या सुरुवातीला एक आकृतीबंध तयार करणे व तो फुलवत नेऊन समर्पक अशा आकृतीबंधाने त्याचे समेवर विसर्जन करणे हा त्यांच्या गायकीचा आत्मा. बढत रागस्वरांच्या आधारानेच पण मुख्यत: लयीच्या अंगाने होत असे. अशी निर्मिती सातत्याने करीत राहणे हाच त्यांचा मोठेपणा होता. त्यांच्या गायनाची सुरेलपणा, रागरागिणीची उत्तम माहिती, लयतालावरील प्रभुत्व अशी अनेक वैशिष्ट्ये होती. अनेक अनवट रागांचा त्यांच्या गायकीमध्ये अंतर्भाव होतो. उदा., त्रिवेणी, बिहारी, देवसाख इ. राग.

मल्लिकार्जुन मन्सूर यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. त्यांत भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ (१९७०) व ‘पद्मभूषण’ (१९७६), कर्नाटक विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लेटर्स ही सन्माननीय पदवी (१९७५), कर्नाटक राज्याचा राज्य अकादमी पुरस्कार (१९६२) आणि राज्य सेवा प्रशस्ती पुरस्कार (१९६८), दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीकडून सर्वश्रेष्ठ गायक म्हणून पारितोषिक (१९७२) व मानद सदस्यत्व (१९८३) इत्यादींचा त्यांत अंतर्भाव होतो. मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान प्रशस्ती पुरस्कार सर्वप्रथम मल्लिकार्जुन मन्सूर यांना लाभला. तद्वतच कर्नाटक विद्यापीठाने संगीत विभाग सुरू करून त्या विभागाचे सन्माननीय प्रमुखत्व मन्सूरांना दिले. आपली संगीतविद्या मुक्तपणे मन्सूर तेथे देत असत. भारत सरकारने १९९२ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.

मन्सूर यांचा विवाह गंगम्मा यांच्याशी झाला. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर आणि पुत्री नीला कोडली हेही गायक आहेत. श्रीपाद भिर्डीकर, सिद्धराज जंबलदिनी, मट्टीगट्टी हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. त्यांचे नन्न रसयात्रे (१९८३, म. शी. माझी रसयात्रा) हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात संगीतसाधनेसाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट, गुणग्राहकता, गुरूप्रेम आणि कलावंताला शोभणारी नम्रता प्रकर्षाने दिसून येते. या पुस्तकाचा त्यांच्या मुलाने राजशेखर मन्सूर यांनी My Journey in Music  या नावाने इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे. त्यांचे वयाच्या एक्काऐंशीव्या वर्षी धारवाड, कर्नाटक येथे फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. भारतीय टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ २०१४ मध्ये टपाल तिकिटाचे अनावरण केले आहे.

 

समीक्षक : श्रीकांत डिग्रजकर

लेख के प्रकार