Skip to main content

अरुण दाते

अरुण दाते

दाते, अरुण (अरविंद) रामूभैय्या : (४ मे १९३४ – ६ मे २०१८). मराठी भावगीत गायकीला गझलसदृश मुलायम वळण देणारे प्रथितयश गायक. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचे पणजोबा मूळगाव अडिवरे (जि. रत्नागिरी) येथून शिक्षणासाठी पायी चालत इंदूरला गेले व शिक्षणोत्तर तेथेच दरबारी न्यायालयात काम करू लागले. ते तेथील एक नि:स्पृह न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे वडील रामूभैय्या हे शासकीय अधिकारी आणि साहित्याचे व शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यांच्या आई माणिकबाई या गृहिणी होत्या. या दांपत्यास तीन मुली व दोन मुलगे. अरुण दाते यांचे भाऊ रवी हेही तरबेज तबलावादक होते. दातेंच्या घरात अल्लादियाखाँ, अहमदजान थिरकवा, गोविंदराव टेंबे, हिराबाई बडोदेकर, बेगम अख्तर इत्यादी संगीत कलावंतांचा व वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके इत्यादी साहित्यिकांचा सहज वावर होता. त्यांच्या चर्चांतून, मैफिलींतून तसेच वडिलांच्या संग्रहातील ध्वनिमुद्रिकांच्या श्रवणातून शास्त्रीय संगीताचे, साहित्याचे व उर्दू शायरीचे संस्कार अरुण दाते यांच्यावर झाले. त्यांना उर्दू गझल व हिंदी गाणी म्हणण्याचा छंद जडला. त्यांच्या मूळच्या मुलायम आवाजाला, गळ्यातील उत्तम फिरतीला शब्दानुरूप उच्चारांच्या पोताची जोड होती; ह्या त्यांच्या गायनवैशिष्ट्यांना त्यांच्या वडिलांनी सुरेलपणाचे कोंदण दिले. अरुण दाते यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंदूरला झाले. त्या वयात त्यांना क्रिकेटची व नाट्याभिनयाचीहू आवड होती.

प्रख्यात गायक तलत मेहमूद हे अरुण दातेंचे गायनातील आदर्श होते. दातेंना कुमार गंधर्वांकडून गझलगायनाचा पहिला धडा मिळाला. त्यानंतर सुगम संगीतातील गुरू के. महावीर (मुंबई) ह्यांच्याकडे त्यांचे इंदूरला पद्धतशीर गंडाबंधन झाले. ते मुंबईत हार्मोनियमवर तालीम व रियाझ करीत. हे करतानाच मर्फी मेट्रो गायन स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. तेथे त्यांना यश मिळाले (१९५८). नंतर त्यांनी हिंदी गाण्यांचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. आकाशवाणीची हिंदी गाण्यांची चाचणी पास झाल्यानंतर (१९६०) त्यांनी आकाशवाणीच्या भावसरगम कार्यक्रमात हिंदी गीतांचे व गझलांचे गायन केले. तेथेच त्यांचा मराठीतील ख्यातनाम संगीतकार यशवंत देव यांच्याशीही परिचय झाला. तत्पूर्वी नामवंत संगीतकार दशरथ पुजारींची गाणी ऐकून त्यांना मराठी भावगीते गाण्याची प्रेरणा मिळाली होती; पण मराठी बोलण्याची सवय नसल्यामुळे त्यांनी मराठी भावगीत गायनात फारसा उत्साह दाखवला नाही. याच कारणाने सुरुवातीस त्यांनी मराठीतील प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी दिलेल्या गायनाच्या निमंत्रणालाही नकार दिला; पण खळे यांच्या आग्रही पाठपुराव्याला यश मिळाले. १९६० मध्ये त्यांनी ‘शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी’ ह्या गायिका सुधा मल्होत्रा यांच्यासह गायलेल्या आणि पुढे लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण केले. आकाशवाणीच्या ‘मासिक गीत’ या कार्यक्रमात या गाण्याचे प्रक्षेपण झाले. आकाशवाणीवर अनवधनाने गायकाचे नाव ‘अरविंद’ ऐवजी ‘अरुण’ सांगितले गेले आणि तेच नाव पुढे कायम झाले. त्याच वर्षी त्यांची ‘अखेरचे येतील माझ्या’, ‘सखी शेजारिणी’ इत्यादी आणखी चार गाणी (ह्या पाचही गीतांचे गीतकार मंगेश पाडगावकर) एच.एम.व्ही.ने ध्वनिमुद्रित केली. ती सर्व गाणी व त्याचबरोबरीने गायक म्हणून अरुण दातेही लोकप्रिय होत गेले. याचदम्यान त्यांनी मुंबईतील व्ही. जे. आय. टी. या शैक्षणिक संस्थेतून टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि पुढे बिर्ला (सिमको), टाटा, मफतलाल इत्यादी प्रथितयश संस्थामध्ये त्यांनी काम केले. १९६० ते ७० हा काळ त्यांच्या गायन-कारकीर्दीचा सुवर्णकाळ ठरला. त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी अनेक गाणी अतिशय लोकप्रिय झाली. त्यांची ग्वाल्हेरला बदली झाल्यावर भोपाळ आकाशवाणीवर ‘B high’ (बी हाय) दर्जा मिळून त्यांचे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. १९८७ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. यानंतर कार्यक्रम व ध्वनिमुद्रणे ह्यांचा सतत धडाका सुरू झाला.

अरुण दातेंनी गायलेली ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’, ‘येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘संधिकाली या अशा’ इत्यादी गाणी खूप गाजली व ती आजही श्रोत्यांना आवडतात.

अरुण दाते यांना श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर असे दर्जेदार संगीतकार लाभले. सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, कुंदा बोकील, अनुराधा मराठे व कविता कृष्णमूर्ती इत्यादी नामवंत सहगायिकांसोबत गायलेली त्यांची अनेक गाणी खूप प्रसिद्ध झाली. गरजेनुसार विविध गायनाच्या कार्यक्रमात ते नवनवीन गायिकांचेही सहकार्य घेत असत. भारतात व परदेशांतील अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, मस्कत इत्यादी विविध देशांत मिळून त्यांचे सुमारे दोन हजार गायनाचे कार्यक्रम झाले.

श्रीनिवास खळे रजनी ह्या संगीत कार्यक्रमातही अरुण दाते यांचा विशेष सहभाग होता. चित्रपटांपासून ते खेळांपर्यंत विविध क्षेत्रातील नामवंतांचा निखळ स्नेह त्यांना लाभला. शुक्रतारा मंदवारा, आकाशगंगा, भाव-सरगम ही त्यांच्या ध्वनिमुद्रिकांची शीर्षके होत. शतदा प्रेम करावे हे तर त्यांच्या कार्यक्रमांचे, ध्वनिमुद्रिकेचे व आत्मचरित्राचेही शीर्षक आहे. त्याशिवाय ‘शुक्रतारा मंदवारा’ ह्या शीर्षकाखालीही त्यांनी अनेक कार्यक्रम केले. शुक्रतारा मंदवारा ह्या नावाने त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. याचे शब्दांकन सुलभा तेरणीकर यांचे आहे. त्यांचा मुलगा अतुल ह्यानेही त्यांच्याविषयीच्या आठवणींचे एक पुस्तक हात तुझा हातातून २०१९ साली प्रसिद्ध केले आहे. वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेतर्फे महापौरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याशिवाय १९९३ मध्ये अमेरिकेतल्या तुसाँ सिटीतर्फे मानद नागरिकत्व, गजाननराव वाटवे पुरस्काराचे व महेंद्र कपूर पुरस्काराचे पहिले मानकरी, महाराष्ट्र पत्रकार संघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ह्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. वयाला अनुसरून २०१० सालापासून त्यांनी जाहीर कार्यक्रम बंद केले होते.

अरुण दाते यांचा विवाह पूर्वाश्रमीच्या मीना राजे यांच्याशी झाला. या दांपत्यांच्या दोन मुलांपैकी अतुल हे संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत.

अरुण दाते यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ :

दाते, अरुण, शतदा प्रेम करावे, पुणे, १९९५.
Share this:

लेख के प्रकार