Skip to main content

किशन महाराज

किशन महाराज

पंडित किशन महाराज : (३ सप्टेंबर १९२३ – ४ मे २००८). बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीरचौरा येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पं. हरी महाराज यांच्याकडे त्यांनी बालवयापासून तबलावादनाचे शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी त्यांचे चुलते पं. बलदेव सहाय यांचे शिष्य व बनारसचे श्रेष्ठ वादक पं. कंठे महाराज यांच्याकडून तबल्याची तालीम घेतली.

कुशाग्र बुद्धीमुळे आणि चिकाटीने किशन महाराज यांनी बनारस घराण्यासह सर्व घराण्यांच्या वादनवैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास केला होता. गणित व लयकारीवर त्यांचे प्रेम होते. त्यांनी विषम तालावर लक्ष केंद्रित करून ९, ११, १३, १५, १९ व २१ मात्रांच्या तालामध्ये तबलावादन केले. १४ व १६ इत्यादी सम तालांवरही त्यांचे प्रभुत्व होते. तबल्याची भाषा अवगत असल्याने त्यांचे तबलावादन विद्ववत्तापूर्ण व सौंदर्यपूर्णही होई. वादनात प्रत्येक तालावरील त्यांचा स्वतंत्र विचार दिसून येई. स्वतंत्र वादनाबरोबरच गायन, वादन व नृत्य यांची साथसंगतही ते उत्तमप्रकारे करीत. उस्ताद फैयाजखाँ, पं. ओंकार ठाकूर, उस्ताद बडे गुलामअलीखाँ, पं. भीमसेन जोशी, वसंत राय, पं. रवीशंकर, उस्ताद अली अकबरखाँ इत्यादी नामांकित कलाकारांबरोबर त्यांनी उत्तम साथ केली. कथ्थक नृत्यासाठीची त्यांची साथसंगत लक्षवेधक असे. सुप्रसिद्ध नृत्यकार पं. बिरजू महाराज यांच्या आवडत्या संगतकरांपैकी ते एक होते. शंभू महाराज, सितारादेवी, पं. गोपीकृष्ण यांच्याबरोबरच्या त्यांनी केलेल्या अनेक मैफली खूप प्रसिद्ध झाल्या. किशन महाराज यांनी नीचा नगर, आंधिया, बडी माँ, बनारस उत्सव या गाजलेल्या चित्रपटांसाठी तबलावादन केले.

किशन महाराज यांचा विवाह बीनादेवी यांच्याशी झाला. या दांपत्यास पूरन, अंजली, पूर्णिमा व इंदिरा ही मुले. त्यांचे पुत्र पं. पूरन महाराज हेही प्रसिद्ध तबलावादक आहेत. किशन महाराज यांच्या शिष्यपरिवारामध्ये अनिल पलित, तेजबहादूर निगम, शशिकांत बेल्लारी, नंदन मेहता, कुमार बोस, बालकृष्ण अय्यर, संदीप दास, सुखविंदरसिंंह नामधारी इत्यादींचा समावेश आहे.

किशन महाराज यांना त्यांच्या तबलावादनातील मौलिक योगदानाकरिता अनेक मानसन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९७३) व पद्मविभूषण (२००२) या पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७३), हाफिज अलीखाँ पुरस्कार (१९८६), उस्ताद इनायत अलीखाँ पुरस्कार (२००२), दीनानाथ मंगेशकर पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना देण्यात आले. तालविलास, तालचिंतामणी, लयचक्रवर्ती, लयभास्कर, संगीत सम्राट (१९६९), काशी स्वर गंगा सन्मान, उत्तर प्रदेश रत्न, भोजपुरी रत्न आदी सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले.

उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील खजुरी येथे किशन महाराज यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ संगीत नाटक अकादमीतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ‘तबला सम्राट पं. किशन महाराज व्याख्यान केंद्रा’मधून देशविदेशातील तबलासाधक तबलावादनाचे प्रशिक्षण घेत असतात.

समीक्षक : मनीषा पोळ

लेख के प्रकार