शारदा संगीत विद्यालय
संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी मुंबईतील एक ख्यातनाम संस्था (विद्यालय). या संस्थेच्या संस्थापिका इंदिराबाई केळकर यांचा जन्म कुरुंदवाड (जि. सांगली) येथे झाला. त्या बालकीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मुंबईत येऊन १९२७ मध्ये राहत्या जागेत गायन-वादनाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचे संगीतशिक्षण गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांचेकडे सुरू होते. इंदिराबाईंच्या गायन वर्गास वाढता प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी १९३० मध्ये शारदा संगीत विद्यालयाची बांद्रा, मुंबई येथे स्थापना केली व त्याचे उद्घाटन प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या हस्ते केले. या विद्यालयाचा मूळ उद्देश अभिजात भारतीय हिंदुस्तानी संगीत, नृत्य व नाट्य यांचे विशेषत: प्रयोगीय कलांचे शिक्षण देणे हा आहे. याचठिकाणी गुरुवर्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘नादब्रह्म मंदिर’ स्थापन करण्यात आले. त्याचे उद्घाटन १७ नोव्हेंबर १९८५ रोजी ज्येष्ठ संगीतज्ञ बी. आर. देवधर यांच्या हस्ते झाले. इंदिराबाईंच्या निधनानंतर विद्यालयाची धुरा त्यांचे नातू सुरेश नारंग यांच्याकडे आली. सांप्रत ते या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष व प्रशासकीय विश्वस्त आहेत.
आज ही संस्था गायन, वादन, नृत्य, नाट्य आणि योगविद्या या क्षेत्रांत विविध उपक्रमांचे आयोजन करत आघाडीवर आहे. शिवाय इ. स. २००० मध्ये संस्थेने बालकांसाठी बाल संस्कृती मंदिर सुरू केले आहे. संस्थेस आयएसओचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे (२००७). संस्थेत संगीत शिक्षणासाठीच्या सर्व पायाभूत सोयी असून तिच्या संग्रहात तंतुवाद्ये व सुषीर वाद्ये, पाश्चात्त्य वाद्ये, संगीतशास्त्रावरील ग्रंथसंग्रह इत्यादी साहित्य व संगीताशी संबंधित दृश्यफीती (व्हिडिओ) आणि ध्वनिफीती (ऑडिओ) उपलब्ध आहेत.
सध्या येथे भारतीय संगीत (हिंदुस्थानी आणि कर्नाटक), सुगम संगीत, वाद्य वादन, नृत्य (कथ्थक, भरतनाट्यम्, ओडिसी), पाश्चात्त्य संगीत (ट्रिनिटी कॉलेजशी संलग्न) आदींचे संगीत विशारद (पदवी समान) आणि संगीत अलंकार (पदव्युत्तर समान) या अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरज यांच्या मान्यतेनुसार आहे. संस्थेत गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांना मोफत किंवा सवलतीत शिक्षण दिले जाते.
‘स्वरनिनाद’ या मासिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि रसिकांना नामांकित कलाकारांचे सादरीकरण ऐकण्याची संधी प्राप्त होते. त्याचप्रमाणे दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर संगीत स्पर्धा भरविल्या जातात. पंडित विष्णु दिगंबर यांच्या नावे पुरस्कार दिले जातात. कार्यक्रमानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये चर्चाही आयोजिल्या जातात. गुरूपौर्णिमा, दसरा, रामनवमी, स्थापना दिन, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव आदी प्रसंगी सांगीतिक कार्यक्रम आयोजिले जातात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनाही सादरीकरणाची संधी दिली जाते. विविध व्यक्तींचे सत्कार, विविध महोत्सव, वेगवेगळे उपक्रम याद्वारे संस्था नेहमीच कार्यरत राहिली आहे .
समीक्षक – सु. र. देशपांडे
लेख के प्रकार
- Log in to post comments
- 17 views