Skip to main content

Bhaskarbuva Bakhale

Bhaskarbuva Bakhale

खले, भास्करबुवा रघुनाथ : ( १७ ऑक्टोबर १८६९ – ८ एप्रिल १९२२ ). एक अष्टपैलू, चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक कलावंत; गायनाचार्य व अभिजात नाट्यसंगीताच्या परंपरेचे प्रवर्तक. भास्करबुवांचा जन्म बडोदे संस्थानातील कठोर या गावी झाला. घरची गरिबी असल्याने प्राथमिक शालेय शिक्षण व त्यानंतर संस्कृत पाठशाळेतले शिक्षण त्यांना फार कष्टाने करावे लागले. त्यांचा आवाज लहानपणापासून गोड असल्यामुळे वर्गशिक्षक त्यांना वारंवार संस्कृत श्लोकपठण करायला लावीत. त्यांच्या या गुणांमुळे पिंगळेबुवा नावाच्या हरिदासाकडे त्यांची संगीतशिक्षणाची सोय झाली. भास्करबुवांच्या आवाजाची कीर्ती पुढे किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीतील भाऊराव कोल्हटकर यांच्या कानी गेली आणि त्यांनी भास्करबुवांना मंडळींत आणले. मंडळीचा मुक्काम इंदूरला असताना भास्करबुवांचा आवाज सुप्रसिध्द बीनकार उस्ताद बंदे अलीखाँ यांनी ऐकला आणि स्वतः होऊन त्यांनी भास्करबुवांना संगीतशिक्षणासाठी गंडा बांधला. किर्लोस्कर नाटक मंडळीच्या रामराज्यवियोग  या नाटकात त्यांनी मंथरेची, तर संगीतसौभद्र  या नाटकात नारदाची भूमिका केली. सुमारे दोन वर्षे त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये काम केले (साधारणतः सप्टेंबर १८८४ ते ऑक्टोबर १८८६). त्यांचा आवाज फुटल्यामुळे त्यांनी ही नाटक मंडळी सोडली. उच्च दर्जाची गायनकला शिकण्यासाठी ते पुन्हा बडोद्यास आले आणि ग्वाल्हेर घराण्याचे गायक उस्ताद फैजमहंमदखाँ यांचे त्यांनी शिष्यत्व पतकरले. चिकाटीने, मेहनतीने व निष्ठेने त्यांनी खाँसाहेबांकडून विद्या प्राप्त केली आणि खानदानी गवयी म्हणून लौकीक प्राप्त केला. त्यांनी गायलेली नाथ हा माझा, मम आत्मा गमला ही नाट्यपदे खूप गाजली.

उस्ताद फैजमहंमदखाँकडून संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनावरून भास्करबुवांनी आग्रा घराण्याचे उस्ताद नथ्थनखाँ आग्रेवाले यांचा गंडा बांधला. त्यांच्याच सूचनेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर, भास्करबुवांनी जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांना गुरू केले आणि त्यांच्या गायकीचे मर्मही आत्मसात केले.

भास्करबुवांनी ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तीनही घराण्यांच्या गायकीचे सौंदर्य आत्मसात केले होते. चीजेची मांडणी व रागाचे स्वरूप स्पष्टपणे व्यक्त करणारे जिवंत स्वरालाप हे ग्वाल्हेरचे वैशिष्ट्य; तर भावपूर्ण शब्दोचार व लयबद्ध बोलाची मांडणी हे आग्रा घराण्याचे वैशिष्ट्ये आणि लययुक्त, डौल साधणाऱ्या वैचित्र्यपूर्ण तानांच्या आकृती निर्माण करणारे जयपूर घराण्याच्या गायकीचे वैशिष्ट्य असा त्रिवेणी संगम त्यांच्या गायकीत झाला होता. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, सुगम संगीत इत्यादी संगीताचे प्रकार सारख्याच प्रभुत्वाने आणि ढंगदारपणे गाणारे ते कलावंत होते. शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली वापरून त्यांनी नाट्यगीते संगीतबद्ध केली. सौंदर्ययुक्त आणि समतोल गायकीचा उच्च आदर्श त्यांनी संगीत जगतात निर्माण केला. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, सौंदर्यपूर्ण गायकी आणि प्रेमळ व दिलदार स्वभाव या तीनही गुणांमुळे भास्करबुवांची ख्याती हिंदुस्थानात सर्वत्र पसरली आणि कलाक्षेत्रात त्यांना सर्वसामान्यता लाभली.

भास्करबुवांनी विद्यादानही मुक्तपणे केले. आरंभी किर्लोस्कर आणि नंतर गंधर्व नाटक मंडळीचे ते संगीत गुरू होते. विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी  यांसारख्या संगीतनाटकांना संगीत देऊन तसेच बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या समर्थ कलावंतांना तालीम आणि मार्गदर्शन देऊन मराठी नाट्यसंगीताचे दर्जेदार स्वरूप त्यांनी घडविले व नाट्यसंगीतात सौंदर्ययुक्त व भरीव अशी कामगिरी केली. नाट्यसंगीत त्यांनी अभिजात संगीताच्या पातळीवर नेऊन ठेवले. त्यांनीच घडविलेले हे नाट्यसंगीताचे स्वरूप आजही कमी अधिक फरकाने कायम असल्यामुळे त्यांना नाट्यसंगीताचे ‘कुलस्वामी’ म्हणून संबोधता येईल. मास्तर कृष्णराव, बालगंधर्व, बागलकोटकर, पाटणकरबुवा बापूराव केतकर वगैरे त्यांची शिष्यमंडळी विख्यात होती. गोविंदराव टेबें, र. कृ. फडके, केशवराव भोळे वगैरे कलावंत त्यांना गुरुस्थानी मानीत असत. रसिकांनी त्यांना ‘देवगंधर्व’ ही मानाची पदवी दिली.

भास्करबुवांनी धारवाड येथील ट्रेनिंग कॉलेजात काही काळ संगीत शिक्षक म्हणून नोकरीही केली (१९०६-०८). त्यांनी पुणे येथे ‘भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली (१९११).

भास्करबुवांचे पुणे येथे निधन झाले. ‘भारत गायन समाज’ ही संस्था दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ ‘देवगंधर्व संगीत महोत्सवाचे’ आयोजन करते.

संदर्भ :

केळकर, नी.य., भास्करबुवा बखले, मुंबई, १९६७.
समीक्षण : सुधीर पोटे

लेख के प्रकार