पुणे भारत गायन समाज
पुणे भारत गायन समाज : हिंदुस्थानी संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ आणि संगीतप्रशिक्षण यासाठी कार्यरत असलेली एक जुनी संगीतसंस्था. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी जिज्ञासूंना सहज संगीत शिकता यावे या हेतूने दि. १ सप्टेंबर १९११ रोजी या संस्थेची स्थापन केली. किर्लोस्कर संगीत नाटक मंडळींचा या संस्थेस पाठिंबा असल्याने संस्थेचे नामकरण ‘किर्लोस्कर भारत गायन समाज’ असे करण्यात आले. कालांतराने ते ‘भारत गायन समाज’ असे झाले. भास्करबुवांच्या निधनानंतर (१९२२) दत्तोपंत बागलकोटकर, बापूराव केतकर, शंकरराव अष्टेकर, गोविंदराव टेंबे, बालगंधर्व, ताराबाई शिरोडकर, मास्तर कृष्णराव प्रभृतींनी व त्यांच्या शिष्यांनी हे कार्य नेटाने पुढे चालू ठेवले. संस्थेने १९२८ मध्ये पुण्यात शनिपार, शुक्रवार पेठ येथे वास्तू खरेदी केली. ‘भास्कर संगीत विद्यालय’ ही शिक्षण शाखा १९४५ साली येथे सुरू झाली. मास्तर कृष्णराव यांनी या संस्थेचा दहा वर्षांचा अभ्यासक्रम तयार केला. पुढे पुण्यातील एक जुनी संस्था ‘पुणे गायन समाज’ आणि ‘भारत गायन समाज’ या संस्थांचे विलीनीकरण होऊन १९४१ मध्ये ‘पुणे भारत गायन समाज’ ही संस्था अस्तित्वात आली.
संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयामध्ये हिंदुस्थानी अभिजात संगीत तसेच हार्मोनियम, तबला, व्हायोलिन, सतार ही वाद्ये आणि भरतनाट्यम् व कथ्थक या नृत्यप्रकारांचे शिक्षण दिले जाते. दरवर्षी अभ्यासक्रमानुसार एप्रिल आणि डिसेंबर या महिन्यांत परीक्षा घेतल्या जातात. दहा वर्षांच्या या अभ्यासक्रमामध्ये तीन वर्षांनंतर संगीत मध्यमा, पाचव्या वर्षी संगीत कुशल, सातव्या वर्षी संगीत विशारद आणि दहाव्या वर्षी संगीत पारंगत ही प्रमाणपत्रे दिली जातात. संस्थेच्या अभ्यासक्रमास १९६२ मध्ये राज्य शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे इतरही संलग्न संगीत महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविला जातो. भास्कर संगीत विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचा जो तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालविला जातो. तो प्रत्येक वर्षांच्या दोन डीव्हीडी यानुसार तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचे पुस्तकही परीक्षार्थींना दिले जाते. घरून अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना याचा उपयोग होतो. या विद्यालयाने संगीत अभ्यासकांकरिता भास्कर संगीत प्रवेशिका, राग संग्रह (खंड १ ते ३), हार्मोनियम प्रवेश (खंड १ ते ३), तबलावादन प्रवेश (खंड १ व २), ताल साधना (खंड १ व २) आणि तालविज्ञान या पुस्तकांची निर्मिती केली आहे. संस्थेमध्ये संगीतविषयक अनेक पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे. तसेच जुन्या पिढीतील अनेक ख्यातकीर्त संगीत कलाकारांच्या ध्वनिमुद्रिकांचे जतन करण्यात आलेले आहे. भास्करबुवांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे ऑक्टोबर २००० मध्ये भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भीमसेन जोशी, नौशाद अली इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच याचवर्षी पं. भास्करबुवा यांनी रचलेल्या गाण्यांसह संगीत स्वयंवर या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
संस्थेमध्ये सुगम संगीत कार्यशाळा, वासंतिक वर्ग, नाट्यसंगीत शिक्षण, कलाकारांचे सन्मान आदींद्वारे कार्य सुरू आहे. माणिक वर्मा, अरविंद थत्ते, नरेंद्र भिडे, संजय देशपांडे इत्यादी मान्यवर संस्थेचे विद्यार्थी होत. संस्थेने गायन, वादनाची क्रमिक पुस्तके तसेच भास्करबुवांच्या संग्रहातील शंभर बंदिशींचे स्वरलेखन असलेले माधुसंचयन आदी पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच राम मराठे, मास्तर कृष्णराव, छोटा गंधर्व आदींवर माहितीपटांची निर्मिती केलेली आहे.
संस्थेतर्फे हिंदुस्थानी अभिजात संगीताबरोबरच प्रामुख्याने नाट्यसंगीतही तरुण गायकांवर बिंबवणे आणि नाट्यसंगीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे या उद्देशाने १९६८ पासून बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धा भरविली जाते. यामध्ये ८ ते ३५ वर्षे वयोगटातील होतकरू तरुणांना प्रवेश दिला जातो.
भास्करबुवांच्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतील आप्तमंडळींनी संस्थेची परंपरा नेटाने पुढे सुरू ठेवली आहे.
समीक्षण : सु. र. देशपांडे
लेख के प्रकार
- Log in to post comments
- 32 views