Skip to main content

दिनकर कायकिणी

 कायकिणी, दिनकर  दत्तात्रय : (२ ऑक्टोबर १९२७ – २३ जानेवारी २०१०). हिंदुस्थानी संगीतातील आग्रा घराण्याचे शैलीदार गायक, गुरू, वाग्गेयकार, संगीतज्ज्ञ व आयोजक. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे आई-वडील दोघांनाही गाण्याची आवड होती. त्यांच्या आई कृष्णाबाई (कुटाबाई) या उत्तम भजने गाणा­ऱ्या म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या गाण्याचे संस्कार लहानवयापासून दिनकर यांच्यावर झाले. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण पतियाळा घराण्याचे पं. नागेशराव करेकट्टी यांच्याकडे घेतले. त्यानंतर १९३६ पासून पं.ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून ग्वाल्हेर गायकीची तालीम घ्यायला त्यांनी सुरुवात केली. जुलै १९३९ मध्ये ते लखनौ येथील मॅरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिकमध्ये (आताचे भातखंडे विद्यापीठ) दाखल झाले. येथे त्यांना पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर तसेच त्यांचे शिष्य पं. एस. सी. आर. भट यांची तालीम मिळाली. येथे त्यांनी १९४३ साली पं. विष्णु नारायण भातखंडे सुवर्णपदकासह “संगीत विशारद” ही पदवी संपादन केली.

१९५४ मध्ये कायकिणी दिल्ली आकाशवाणीवर उपनिर्माता (सुगम संगीत) म्हणून रुजू झाले. १९६४ मध्ये त्यांची माहिती व नभोवाणी संचालनालयात नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी १९७१ मध्ये भारतीय विद्याभवनाच्या संगीत आणि नर्तन शिक्षापीठाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी स्वीकारली. तेथे विद्यार्थीसंख्या वाढावी व सर्व वयोगटातील संगीताची आवड असणाऱ्या लोकांना तेथे शिक्षण घेता यावे याकरिता यशस्वी प्रयत्न केले.

गायनाबरोबरच कायकिणी यांनी लच्छन महाराज व शंभू महाराज यांच्याकडून नृत्याची, तर प्रसिद्ध तबलावादक उ. शमसुद्दीन खाँ यांच्याकडून तबलावादनाचीही तालीम घेतली होती. १९४९ साली पं. जवाहरलाल नेहरूलिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारीत, पं. रविशंकरनिर्मित बॅलेमध्ये त्यांची निवड झाली. अहिंसा (१९५०) या डॉ. मार्की यांच्या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचेही कामही त्यांनी सुरू केले.

कायकिणी यांच्या गायकीवर उ. फैय्याज खाँ (आग्रा घराणे) यांच्या गायकीचा प्रभाव दिसून येतो. रागाची शुद्धता, शिस्त, आक्रमकता, नोमतोम्, शब्दभाव, स्वरभाव  व लयभावावरची हुकूमत ही त्यांच्या गायकीची काही वैशिष्ट्ये आहेत. संगीतातील अनेक विषयांवर त्यांनी देशात व परदेशात ठीकठिकाणी सप्रयोग व्याख्यानेही दिली. “दिनरंग” या टोपणनावाने त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण बंदिशींच्या रचना केल्या आहेत, ज्या अनेक प्रतिष्ठित कलाकारांद्वारे आजही गायल्या जातात. त्यांपैकी निवडक ११२ बंदिशींचा रागरंग  नावाचा संग्रहही १९८७ साली प्रसिद्ध झाला आहे.

कायकिणी यांच्या संगीतमयी कारकीर्दीचा टी. एम. ए. पै फाउंडेशन पुरस्कार (१९९५), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९७), आय. टी. सी. संगीत रिसर्च अकादमी पुरस्कार (१९९८), स्वरसाधनारत्न पुरस्कार (१९९९), मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार (२००३) इत्यादी पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

प्रसिद्ध पार्श्वगायक उदीत नारायण, ललिथ जे. राव, सुधीर भातखंडे, दिनकर कायकिणी यांची पत्नी शशिकला कायकिणी, मुलगी आदिती कायकिणी-उपाध्याय, पुत्र योगेश सम्सी (प्रसिद्ध तबलावादक) या आणि अशा अनेक कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन व तालीम दिली आहे. दिनरंग सूरमयी जीवनगाथा  हे सदाशिव बाक्रे यांनी त्यांचे लिहिलेले चरित्र होय.

कायकिणी यांचे मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ

बाक्रे, सदाशिव, दिनरंग सूरमयी जीवनगाथा, २००५.

लेख के प्रकार