Skip to main content

अशोक दामोदर रानडे

अशोक दामोदर रानडे

रानडे, अशोक दामोदर : (२५ नोव्हेंबर १९३७ – ३० जुलै २०११). भारतातील संस्कृती-संगीतशास्त्राचे अध्वर्यू, संगीतशास्त्रज्ञ-रचनाकार, गायक व गुरू म्हणून विख्यात. संगीतविचाराच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मौलिक व व्यापक असे आहे. त्यांचा जन्म दामोदर व काशीबाई या सुशिक्षित-संगीतप्रेमी दांपत्यापोटी पुणे येथे झाला. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. पुढे ते पुण्याहून मुंबईस आले. त्यांचे शालेय शिक्षण आर्यन हायस्कूल येथे झाल्यावर त्यांनी एल्एल्. बी. (१९६०, मुंबई विद्यापीठ), एम.ए. मराठी व इंग्रजी (१९६२ व १९६४, विल्सन कॉलेज) या पदव्या प्राप्त केल्या. याशिवाय त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ येथून ‘संगीतचार्य’ (१९७८) ही पदवी घेतली. गजाननबुवा जोशी (१९४८ ते ५८), प्रह्लादपंत गानू (१९५८ ते ६२), लक्ष्मणराव बोडस (१९६२ ते ६६) आणि बी. आर. देवधर (१९७० ते ७४) या चार दिग्गज गुरुंकडून त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर व पतियाळा या घराण्यांची गायकी, राग व बंदिशींची तालीम संपादन केली. ही गानविद्या त्यांनी व्यासंगाने जोपासली. देवधरांकडून त्यांनी आवाज-जोपासनाशास्त्राचेही पाठ घेतले. संगीताच्या पारंपरिक तालमींबरोबरच त्यांनी न्यायविधी, मराठी व इंग्रजी साहित्य इत्यादींचा व्यासंग केला. त्यांना रशियन व बंगाली भाषेची जाण होती.

रानडे यांनी सुरुवातीस मुंबई आकाशवाणीत नोकरी केली (१९६३ – ६६). पुढे सिद्धार्थ कॉलेजमध्ये अध्यापन (१९६७-६८) केल्यानंतर त्यांची निवड मुंबई विद्यापीठाच्या म्युझिक सेंटरचे (संगीत विभाग) संचालक म्हणून झाली (१९६८–१९८३). या कार्यकालात त्यांनी या संगीतकेंद्राची पायाभरणी केली. संगीतक्षेत्रातील नामवतांना पाचारण करून, विद्यार्थी व ज्येष्ठ कलाकारांचे संगीतमहोत्सव, परिसंवाद, शिबिरे आयोजित केली आणि विभागात सुसज्ज ध्वनीमुद्रणकक्ष उभा केला. याद्वारे ध्वनिसंग्रहालय निर्माण झाले, पारंपरिक संगीतशिक्षण आणि आधुनिक विद्यापीठीय पद्धत या दोन्हींचा समन्वय येथे घातला गेला. नंतर ते ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेच्या संस्कृतीसंगीतशास्त्र संशोधन केंद्राचे संचालक होते (१९८३-८४). एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स) येथे रंगभूमी संवर्धन व संशोधन प्रकल्पासाठी ते सहसंचालक म्हणून कार्यरत होते (१९८४–९३). या काळात त्यांनी रंगभूमी व संगीत या दोन्हींच्या संदर्भात संशोधन, दस्तऐवजीकरण केले; आवाजसाधना या विषयावर अनेकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. तसेच अनेक संकल्पनाधारित कार्यक्रमही सादर केले आणि अन्य कलाकारांना व शास्त्रकारांनाही त्यांनी संगीतविचार मांडण्यासाठी उद्युक्त केले. एखाद्या विषयासाठी चर्चासत्र वा परिसंवाद आयोजित करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ञांची निवड ते करत असत. इंडियन म्युझिकॉलॉजिकल सोसायटी व म्युझिक फोरमतर्फे एनसीपीएमध्ये दरवर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिसंवादांत भारतीय व विदेशी कलाकार, विद्वानांना निमंत्रित करून त्यांनी विविध क्षेत्रांतील जाणकारांद्वारे उच्च दर्जाचे ज्ञानमंथन घडवले. त्यांनी मोजक्या मैफली केल्या. ‘रसिकरंग’ या नावाने त्यांनी धृपद, ख्याल, चतुरंग, तराना, ठुमरी, दादरा इत्यादी प्रकारांतील सु. १०० बंदिशी बांधल्या. रचनात्मक सौंदर्य हे त्यांच्या बंदिशींचे वैशिष्ट्य होय. त्यांनी गायलेल्या यमन, बिहाग व भैरवी या रागांतील बंदिशींची संचय  ही सी.डी. अंडरस्कोअर रेकॉर्ड्सने प्रसिद्ध केली आहे. अनेक संतकवींच्या मराठी व हिंदी भक्तिरचना त्यांनी स्वरबद्ध केल्या. ‘बैठकीची लावणी’ या प्रकारच्या सु. ८० लावण्या त्यांनी रचल्या.

रानडे यांनी संगीताच्या चौफेर व्यासंगातून एकंदर २० संकल्पनाधारित दर्जेदार कार्यक्रम सादर केले. त्यांतील ‘बैठकीची लावणी’, ‘देवगाणी’, ‘गीतिभान’, ‘संतांची वाटचाल’, ‘कलागणेश’, ‘रामगाणे’ या त्यांच्या कार्यक्रमांची व्यावसायिक ध्वनिमुद्रणे प्रसिद्ध झाली आहेत. सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्ससाठी त्यांनी वझेबुवा, ओंकारनाथ ठाकूर, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, मास्तर कृष्णराव, सैगल, एस. डी. बर्मन, मदन मोहन इत्यादी नामवंत तसेच चित्रपटाच्या आरंभीच्या काळातील संगीतकार, गझलची सांगीतिक वाटचाल, विवेकानंद आणि संगीत, वंदे मातरम इत्यादी अनेक विषय यांवर, ध्वनिमुद्रणांवर भाष्य करत सप्रयोग व्याख्याने दिली. ते उत्तम वक्ते म्हणून ओळखले जात असत. त्यांचे मूलगामी विवेचन कलाकार व सर्वसामान्य श्रोत्यांना लाभदायक ठरे. मुंबई दूरदर्शनवरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या मालिकेत त्यांनी घेतलेल्या मल्लिकार्जुन मन्सूर, गजाननबुवा जोशी, भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती संस्मरणीय ठरल्या होत्या.

रानडे यांनी चव्हाटा (१९७१), मिथमेकर्स (१९७१), शोनार बांगला (१९७२), माता द्रौपदी (१९७२), देवाजीने करुणा केली (१९७३), संध्याछाया (१९७९), एक झुंज वाऱ्याशी (१९८८), काळा वजीर पांढरा राजा (१९९२), टेम्प्ट मी नॉट (१९९३), राहिले दूर घर माझे (१९९५) या दहा नाटकांसाठी, तसेच बाबा आमटे  व सिंगिंग लाईन या दोन लघुपटांसाठी आणि देवी अहिल्याबाई (२००३) या हिंदी चित्रपटासाठी संगीतदिग्दर्शन केले. आकार आणि डिस्कव्हरी ऑफ इंडिया ही प्रदर्शने, ऑन फतेहपूर सिक्री या वॉक थ्रूसाठीही त्यांनी संगीत दिले.

मुद्देसूद, अल्पाक्षरसौंदर्य असलेले, मर्मग्राहक, विश्लेषणयुक्त आणि पारिभाषिक संज्ञांचा यथार्थ वापर करणारे तर्कशुद्ध लेखन हे रानडे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. त्यांनी मराठी व इंग्रजीतून विपुल लेखन केले आहे. त्यांचीसंगीताचे सौंदर्यशास्त्र (१९७१), लोकसंगीतशास्त्र (१९७५), स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र (१९७५), भाषणरंग (१९९५), भाषण व नाट्यविषयक विचार (२००१), हिंदुस्थानी संगीत (२००६), संगीतविचार (२००९), मला भावलेले संगीतकार (२०१०), हिंदी चित्रपटगीत (२०१०, याचा हिंदी अनुवाद २०१४ मध्ये प्रकाशित), संगीत संगती (२०१४, रानडे यांच्या निवडक मराठी लेखांचा संग्रह – निधनोत्तर प्रकाशित) ही दहा पुस्तके मराठीत आहेत. ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स ऑफ हिंदुस्थान (१९८४), स्टेज म्युझिक ऑफ महाराष्ट्र (१९८६), महाराष्ट्र आर्ट म्युझिक (१९८९), की-वर्ड्स अँड कन्सेप्ट्स इन हिंदुस्थानी आर्ट म्युझिक (१९९०), म्युझिक अँड ड्रामा (१९९१), इंडॉलजी ऑफ एथ्नोम्युझिकॉलॉजी (१९९२), हिंदुस्थानी म्युझिक (१९९७), एसेज इन एथ्नोम्युझिकॉलॉजी (१९९८), रिफ्लेक्शन्स ऑन म्युझिकॉलॉजी अँड हिस्टरी (२००१), हिंदी फिल्म साँग (२००६), ए कन्साईज डिक्शनरी ऑफ हिंदुस्थानी म्युझिक (२००६), परस्पेक्टिव्ह्ज ऑन म्युझिक (२००८), सम प्रॉमिनंट म्युझिशियन्स ऑफ हिंदुस्थान : दे लिट् दि वे (२०११) ही पुस्तके इंग्रजीत लिहिली आहेत. या पुस्तकांतील त्यांचे लेखन व्यापक व मूलगामी आहे. त्यांनी हास्य, विनोद आणि सुखात्मिका (१९९२) आणि कथाशताब्दि (१९९३) या दोन ग्रंथांचे संपादन ख्यातनाम लेखक व समीक्षक विजया राजाध्यक्ष यांच्यासमवेत केले. गंगूबाई हनगल यांच्यावरील मल्टिमीडिया अल्बमचे संपादन त्यांनी केले होते (१९८८). संगीत नाटक अकादमीच्या नियतकालिकाच्या चित्रपटसंगीतविषयक अंकासाठी, संगीत कला विहारच्या लोकसंगीत, जनसंगीत व धर्मसंगीत या तीन विशेषांकांसाठी, तसेच तरुण भारत  या वृत्तपत्राच्या संगीत विशेषांकासाठी अतिथी संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले. मराठी विश्वकोश तसेच गार्लंड एन्सायक्लोपिडिया ऑफ वर्ल्ड म्युझिक अशा कोशांसाठी त्यांनी लेखन केलेले आहे. याशिवाय विविध संशोधनपत्रिका, नियतकालिके व संपादित पुस्तके यांसाठी त्यांनी इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांत सुमारे ५०० लेख लिहिले आहेत.

रानडे यांचे संगीतशास्त्रातील कार्य बहुआयामी आहे. आधुनिक काळामध्ये पारंपरिक संगीतशास्त्रात संकल्पनांची, सिद्धांतांची भर पडली यांचा व नव्या संगीतशास्त्रीय चौकटी, विचारमार्ग यांचा त्यांनी साकल्याने वेध घेतला. नव्याने निर्माण झालेली संस्कृतीसंगीतशास्त्र (एथ्नोम्युझिकॉलॉजी) ही अभ्यासशाखा, तिच्या अनुषंगाने संस्कृती व अन्य शास्त्रांच्या मार्फत होणारा संगीताचा पुनर्विचार हे रानडे यांच्या संगीतशास्त्रीय मांडणीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. रानडे यांच्या शास्त्रकार म्हणून असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला प्रयोगपरंपरेतील क्रियाशील कलाकार-विचारवंत, विद्वत्परंपरेतील चिकित्सक विश्लेषण करणारा समालोचक, पूर्वसूरी व समकालीन शास्त्रकारांचा विचक्षण अभ्यासक, नवीन संकल्पना व विवेचन मांडणारा सैद्धांतिक, संगीतसंस्कृतीतज्ञ, आस्वादक समीक्षक, सौंदर्यशास्त्री असे अनेक पैलू आहेत. मुख्यत्वे पाश्चिमात्त्य दृष्टीकोनातून झालेला संगीतशास्त्रीय विचार त्यांनी भारतीय परिप्रेक्ष्यातून नव्याने मांडला. सामान्यतः रागसंगीताच्याच परिघात घोटाळणारा संगीतविचार त्यांनी आदिम संगीत, लोकसंगीत, कलासंगीत, धर्मसंगीत, जनसंगीत व संगमसंगीत अशा सहा संगीतकोटींच्या मूलगामी चिंतनातून व्यापक स्तरावर नेला. आरंभी संगीत व साहित्याचा व्यासंगी पट मांडणारे रानडे पुढे समग्र संस्कृतीशास्त्राचे अभ्यासक म्हणून उन्नत झाले. राज्य मराठी विकास परिषदेसाठी त्यांनी पिंपळपान व आकाशदीप या संगीतासोबतच समग्र संस्कृतीचा वेध घेणाऱ्या मालिका सादर केल्या. रानडे यांचे हे संगीतशास्त्री म्हणून असणारे वेगळेपण व श्रेष्ठता पुढल्या पिढीतल्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरली.

रानडे यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांमध्ये सर्वोत्कृष्ट रंगसंगीत दिग्दर्शक पुरस्कार (१९८८ व १९९५) मास्तर कृष्णराव पुरस्कार (१९९८, महाराष्ट्र साहित्य परिषद), म्युझिक फोरम पुरस्कार (१९९८), कलादान पुरस्कार (२००७, महाराष्ट्र सरकार), नरहर कुरुंदकर पुरस्कार (२००९, महाराष्ट्र सरकार), संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पु. ल. देशपांडे पुरस्कार आणि चतुरंग जीवनगौरव पुरस्कार (२०१०)इत्यादींचा समावेश आहे. कोलसन इंडॉलजी फेलोशिप (१९७९, वोल्फसन कॉलेज, ऑक्सफर्ड), सार्कच्या अधिवेशनात भारताचे प्रतिनिधित्व (१९८७, पाकिस्तान), अभ्यागत प्राध्यापक पद (१९८९, क्वीन्स युनिवर्सिटी, आयर्लंड), युनेस्कोच्या एशिअन-पॅसिफिक म्युझिक मटेरीअल अधिवेशनात प्रतिनिधित्व (१९८९, तोक्यो जपान), नॅशनल लेक्चरर ऑफ म्युझिक म्हणून नियुक्ती (१९९१-९२, यू.जी.सी., दिल्ली), टागोर चेअर ऑफ ह्यूमॅनिटीजवर नियुक्ती (१९९४-९५,  एम. एस. विद्यापीठ, बडोदा), युनेस्कोच्या पारंपरिक आशियाई वाद्य अधिवेशनात प्रतिनिधित्व (१९९६, तेहरान, इराण), युनेस्कोच्या संगीतशिक्षण अधिवेशनात प्रतिनिधित्व (१९९८, डेन्मार्क), फोर्ड व्हिजिटिंग फेलोशिप (२००५, स्कूल ऑफ एस्थेटिक्स अँड आर्ट्स, नेहरू विद्यापीठ), एंसाम्बल मॉडर्न या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात संगीतकार म्हणून सहभाग (२००७, बर्लिन, जर्मनी),  डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर म्हणून नियुक्ती (२००७, कोलोरॅडो कॉलेज ऑफ म्युझिक, अमेरिका) असे शैक्षणिक क्षेत्रातील बहुमानही त्यांना लाभले. अनेक भारतीय व विदेशी विद्यापीठांनी त्यांना अध्यापनासाठी निमंत्रित केले तसेच त्यांच्याकरिता संगीताचा अभ्यासक्रम तयार करण्याचे कार्यही त्यांनी केले. भारतातील महत्त्वाच्या विद्यापीठ व संस्थांमधून तसेच देशपरदेशांत अनेक भाषणे व व्याख्यानमाला, गायन व आवाज-जोपासनाशास्त्राच्या कार्यशाळा असे भरीव शैक्षणिक कार्य त्यांनी संस्थात्मक पातळीवर केले.

मुंबई आकाशवाणीमध्ये काम करीत असताना रानडे यांचा परिचय हमिदा इब्राहीम यांच्याशी झाला. त्याही तेथेच काम करीत होत्या. त्या दोघांनी १९६७ मध्ये वेैदिक पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी हमिदा यांनी हेमांगिनी हे नाव स्वीकारले. हेमांगिनी रानडे यांनी हिंदी व गुजराती भाषांत दर्जेदार लेखन केलेले आहे. तसेच आकाशवाणीवरील अनेक नाटकांचे दिग्दर्शन, लेखन केलेले आहे.

मिलिंद मालशे, केदार बोडस, सुरेश बापट, कल्याणी साळुंखे, सुचिता आठल्येकर, विद्या डेंगळे, माधव इमारते, चैतन्य कुंटे यांना रानडे यांच्याकडून रागसंगीताची तालीम मिळाली. तसेच त्यांच्या कार्यक्रमांत गायन-सहभाग असलेल्या श्रुती सडोलीकर, फैयाझ, कीर्ती शिलेदार, उत्तरा केळकर, रंजना जोगळेकर, मेधा गोगटे, स्वरदा साठे, राजश्री पाठक, छाया गांगुली, मंजुषा पाटील, मिलिंद इंगळे, समीर व प्राची दुबळे, श्रीरंग भावे, अमेय जोग इत्यादी गायकांनी त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. अनीश प्रधान व शुभा मुद्गल यांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. गायनासाठीच्या आवाजसाधनेबरोबरच नाट्यासाठीच्या आवाजसाधनेचेही मार्गदर्शन त्यांनी अनेक अभिनेत्यांना वैयक्तिक पातळीवर व नाट्यसंस्थांतील कार्यशाळांद्वारे केले. भक्ती बर्वे, इला भाटे, सयाजी शिंदे इ. कलाकार हे त्यांचे भाषणतंत्रातील काही नामवंत विद्यार्थी होत.

रानडे यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख असलेला मर्मज्ञ हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला (२०१२). २०१४ साली पुणे येथे ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज’ या प्रयोगकला संग्रह-संशोधनकेंद्राची स्थापना करण्यात आली. डॉ. अशोक दा. रानडे ट्रस्टतर्फे दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात, तसेच मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे जुलै महिन्यात त्यांच्या स्मृतिनिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली जाते. मुंबईच्या म्युझिक फोरम संस्थेतर्फे दर वर्षी ज्येष्ठ विचारवंत कलाकार वा शास्त्रकारास ‘डॉ. अशोक दा. रानडे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.

संदर्भ :

टिकेकर, अरुण; कुंटे चैतन्य आणि इमारते, माधव, संपा. मर्मज्ञ : डॉ. अशोक दा. रानडे गौरव ग्रंथ, पुणे २०१२.
 

लेख के प्रकार