क्लॅव्हिकॉर्ड
एक पश्चिमी तंतुवाद्य. सुमारे पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत आणि पुन्हा विसाव्या शतकात वापरात आलेले हे वाद्य आहे. याची उत्क्रांती मानोकॉर्डपासून झाली. १४०४ मध्ये या वाद्यनामाचा पहिल्यांदा वापर झाला. हळूहळू सप्तकांच्या मर्यादा वाढत गेल्या. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून हे वाद्य आविष्काराच्या दृष्टीने मान्यता पावले.
स्वरपट्टी असलेल्या लहान लांबट चौकोनी पियानोसारख्या दिसणाऱ्या या वाद्यात प्रत्येक स्वरासाठी, एक वा दोन तारांवर आघात करणाऱ्या छोट्या हातोड्या असतात. कोणत्याही स्वराची पट्टी दाबली, की हातोडी आणि त्याबरोबर तारही उचलली जाते. स्वराची पट्टी जितकी जोरात दाबावी, तितक्या प्रमाणात तारेवरील ताणही वाढत असल्याने स्वराची तीव्रता, जाणवेल अशा तऱ्हेने, कमीजास्त करता येते. या वाद्यामध्ये हार्पसिकॉर्ड / स्पिनेट वाद्यांप्रमाणे तारा छेडल्या जात नाहीत तसेच पियानोप्रमाणे हातोडीच्या आघाताने ध्वनित होत नाहीत. एखादा संवेदनशील वादनकार कुशल बोटफिरत करून स्वरात अधरपणा (tremolo) न आणता कंप (vibrato) आणू शकतो. तार आणि हातोडी यांतले अंतर कमी असल्याने मृदू आवाज निर्माण करणाऱ्या या वाद्याचा पूर्वीचा इतिहास मोनोकॉर्डपर्यंत नेऊन भिडविता येतो. या शतकात क्लॅव्हिकॉर्डचे पुनरुज्जीवन होत आहे.
लेख के प्रकार
- Log in to post comments
- 2 views