Skip to main content

येहूदी मेन्युइन

एखाद्या विशिष्ट स्वरसमूहाला बीजरूप मानून स्वरांच्या विविध वर्णक्रियांनी त्या बीजाला फुलवायचे ही रागनिर्मितीची एक प्रक्रिया; तर विविध थाट-रचनांमधून रागाला आवश्यक लक्षणांचा उपयोग करून रागनिर्मिती साधायची ही दुसरी प्रक्रिया. या दोन प्रक्रियांच्या साहाय्याने जवळजवळ १,३०० वर्षे भारतामध्ये विविध रागनिर्मिती होण्याची क्रिया चालू आहे. मतंगांच्या पूर्वीच्या काळात रागरचना अस्तित्वात होती हा मुद्दा जरी विवाद्य मानला, तरी मतंगांच्या काळापासून म्हणजे सु. सातव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत ही रागनिर्मिती होतच आहे. भारतासारख्या खंडप्राय देशातील विविध प्रदेशांतील लोकधुनी, तसेच भरतांनी सांगितलेल्या षड्ज ग्राम, मध्यम ग्रामातील मूर्च्छनांच्या आश्रयाने व नंतर मध्ययुगात थाटांच्या आश्रयाने (रागलक्षणे योजून) आतापर्यंत अनेक राग निर्माण झाले आहेत. थाटांमधून अगदी गणिती पद्धतीने राग निर्माण करायचे म्हटले, तरी साधारण १५,५०० राग निर्माण होऊ शकतील. यांत भर म्हणून लोकधुनींपासून निर्माण केलेल राग आहेतच. याशिवाय निरनिराळ्या रागांची मिश्रणे करून, मिश्रराग वगैरे आधुनिक काळात निर्माण झालेल्या रागांची भर आहेच. अशा रागांची उदाहरणे म्हणजे वसंतबहार, पूरिया कल्याण वगैरे होत; परंतु इतके असून साधारणपणे २००/२५० पेक्षा अधिक राग काही प्रचारात नसतात. यांत पुन्हा लोकाभिरुचीप्रमाणे इतक्या वर्षांच्या कालखंडात नवीन राग लोकप्रिय होणे, जुने लोप पावणे ही क्रिया चालू आहेच. पण इतक्या वर्षाच्या रागसंकल्पनेच्या प्रभावामुळे भारतीय संगीतात राग इतका दृढमूल झाला आहे, की संगीताच्या कोणत्याही प्रकारात त्याचा वापर शोधून काढण्याची प्रवृत्ती सामान्य संगीतरसिकांची असते. अगदी शास्त्रीय रागप्रधान संगीतापासून ते लोकगीतापर्यंत संगीताच्या सर्व प्रकारांत, हिंदुस्थानी व कर्नाटक अशा दोन्ही पद्धतींच्या संगीतात रागाची संकल्पना मूळ धरून बसली आहे. म्हणूनच भारतीय संगीतात राग हे प्राणतत्त्व मानले गेले आहे. स्वर व लय या दोन सांगीतिक घटकांमधून रागनिर्मिती हे भारतीय संगीताचे वैशिष्ट्य सिद्ध झाल्यावर हे रागतत्त्व अभिव्यक्त करण्यासाठी संगीताचे विविध गीतप्रकार कसे निर्माण झाले, हे बघणे आवश्यक आहे.

रागगायन आणि गीतप्रकार : शास्त्रीय संगीतात वा रागप्रधान संगीतात रागगायन अथवा रागस्वरूपाचा संपूर्ण आविष्कार हे प्रमुख लक्ष्य असते. यासाठी अनिबद्ध गायन आणि निबद्ध गीत असे दोन प्रकार रागगायनासाठी आहेत. रागांच्या रचनेतील स्वरांचे, शब्दांविरहित, तालविरहित मुक्त गायन हा अनिबद्ध आलापांचा प्रकार असून प्रबंध, धृपद, ख्याल, टप्पा वगैरे अनेक गीतप्रकारांच्या किंवा बंदिशींच्या आश्रयाने रागस्वरूप व्यक्त करणे, हा शास्त्रीय गायनातील दुसरा प्रकार होय. ठुमरी, दादरा, गझल, नाट्यसंगीत यांसारख्या गीतप्रकारांमध्ये बंदिशीमधील यांच्या संयोगाने रसनिष्पत्ती करणे, हा प्रधान हेतू असतो. तथापि रागसंकल्पना आणि रससंकल्पना यांची सांगड भरतकाळापासून चालत आल्यामुळे या उपशास्त्रीय संगीतप्रकारांतही राग हा आधारासाठी असतो. गीत, भजन, लोकसंगीत हे वास्तविक शब्दप्रधान संगीताचे गीतप्रकार होत; पण आपल्याकडे रागसंकल्पनेचा प्रभाव इतका जबरदस्त होता, की अगदी विसाव्या शतकाच्या पहिल्या २५/३० वर्षांपर्यंत सुगम संगीताचे हे प्रकार देखील रागाच्या आधारावर निर्माण होत असत. गेल्या सत्तर वर्षांत मात्र चित्रपटसंगीताच्या संपर्कामुळे तसेच रेडिओ, ग्रामोफोन, ध्वनिमुद्रक इ. आधुनिक वैज्ञानिक तंत्रप्रभावांतून पाश्चात्त्य व इतर संस्कृतींशी अधिक निकट संपर्क आल्यामुळे, शास्त्रीय व उपशास्त्रीय गीतप्रकारांव्यतिरिक्त, संगीताच्या अन्य प्रकारांमध्ये रागसंकल्पनेची पकड ढिली झाल्याचे आढळून येते. संगीताच्या सर्व प्रकारांत रागसंकल्पना डावलण्याची प्रवृत्ती भारतीय संगीतरसिक मनाला कितपत रूचेल, हे काळच ठरवील. सध्या एवढेच म्हणता येईल, की उच्च अभिजात संगीतापुरती रागसंकल्पना दृढमूल आहे आणि इतर लोकरूचिसंबद्ध प्रकारांसाठी ती संकल्पना शिथिल झाली आहे.

पहा : #आसावरी थाटातील राग#कल्याण थाटातील राग#काफी थाटातील राग#खमाज थाटातील राग#तोडी थाटातील राग#पूर्वी थाटातील राग#बिलावल थाटातील राग#भाषांगराग#भैरव थाटातील राग#भैरवी थाटातील राग#मारवा थाटातील राग#रागमाला चित्रे#रागमालिका#लक्षणगीत#कर्नाटक संगीत#हिंदुस्थानी संगीत#सरगम#सुगम शास्त्रीय संगीत#स्वरसप्तक#प्रबंध#धृपद# दादरा#गझल#लोकसंगीत#बंदिश#चित्रपट संगीत

संदर्भ :

Clements, E. The Ragas of Tanjore, London, 1920.
Danielou, Alain, The Ragas of Northern Indian Music, London, 1968.
Kaufmann, Walter, The Ragas of North India, Bombay, 1968.
Prajnananda, Swami, A  Historical Study of Indian Music, New Delhi, 1981.
Sambamoorthy, P. South Indian Music, Book III, IV, Madras, 1963, 1964.
Sastoi, Subrahmanya S. Ragavibodha of Somanatha, Madras, 1945.
आचरेकर, बा.गं. भारतीय संगीत व संगीतशास्त्र, मुंर्बा, १९७४.
घोष, निखिल अनु.पारसनीस, मु. रा. राग-तालाची मूलतत्त्वे आणि अभिनव स्वरलेखन पद्धती, मुंबई, १९७२.
टेंकशे, शंकर अनंत, नव-राग निर्मिती, मुंबई, १९७३.
टेंकशे, शंकर अनंत, राग वर्गीकरण, मुंबई, १९७४.
प्रतापसिंह देव, सवाई संगीतसार, पुणे, १९१०.
भातखंडे, वि. ना. भातखंडे संगीतशास्त्र (हिंदुस्थानी संगीत-पद्धती), भाग १, २, ३, ४, हाथरस,  १९५६,१९५७.
रातंजनकर, श्री. ना. संगीत परिभाषा, पुणे, १९७३.
शार्ङ्गदेव, अनु. तारळेकर, ग. ह. संगीतरत्नाकर, मुंबई, १९७५.
समीक्षक : सुधीर पोटे

Share

लेख के प्रकार